पुन्हा शाळेची घंटा वाजण्याची मुले पाहताहेत आतुरतेने वाट!
'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?'
शाळेत असतांना हे गीत प्रत्येकांच्या ओठांवर असे. हे गीत ऐकल्यावर प्रत्येकाला शाळेतील ते मौजमजेचे, खोडकर आणि धम्माल दिवस नक्कीच आठवत असतील. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी लहान मुलांच्या मनातील भावविश्व ओळखून 'पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय' अशी भोलानाथकडे या गीतातून मजेशीर विचारणा केली होती.
शाळेला सुट्टी मागण्याचे किंवा मिळवण्याचे हे चित्र आता मात्र पुर्णपणे बदलले आहे. आणि शाळा पुन्हा कधी सुरू होईल याची मुले आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे कारण मागील दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद आहेत आणि मुले घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. पण लहान मुले आता या लॉकडाउनला कंटाळली आहेत. त्यांना शाळेत जायचे आहे. या बंधनातून बाहेर पडायचे आहे. म्हणूनच पुन्हा पूर्वीसारखी शाळेची घंटा वाजून शाळा सुरू होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
विशेष म्हणजे शाळा बंद असल्याचा आणि लॉकडाउनचा मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या तिसर्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचाही इशारा दिला आहे. म्हणून पुन्हा पूर्ववत शाळा कधी सुरु होतील, हे निश्चित नाही.
सततच्या लॉकडाउनमुळे घरात मुलांचे श्वास कोंडले आहेत. लहान मुले सतत एकाच जागी राहिल्याने एकलकोंडी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे मनसोपचारतज्ज्ञ सांगतात. सततच्या या एकटपणामुळे ते फार कोणाशी बोलत नाहीत. चिडचिडे होतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही निश्चितच योग्य बाब नाही.
'मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळीवरील वाढ व विकास व्यवस्थित होतो.' असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुले हा दीर्घ लॉकडाउन संपण्याची आतुरतेणे वाट पाहत आहेत. या कोरोना महामारीतून जग बाहेर पडले की, त्यांना पुन्हा एकदा मुक्तपणे बागडायचे आहे, धावायचे आहे. पुन्हा वर्ग मित्रांसोबत मैदानांवर खेळायचे आहे. वर्गात बसून शिकायचे आहे. म्हणूनच ते पुन्हा शाळेची घंटा वाजण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाहुयात कधी शाळेची घंटा वाजते आणि कधी पुन्हा शाळा सुरू होतात ते.
Comments
Post a Comment