सहयोगी शिक्षण अभियान : कोविड काळात शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची शैक्षणिक चळवळ
कोरोना काळात शाळा बंद होत्या, अशावेळी प्रश्न होता तो मुलांच्या शिक्षणाचा. हजारो शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन उपक्रम पोहोचविणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचा या काळात शिक्षण पर्यायांवर अभ्यास सुरू होता. यातूनच उदयास आला 'सहयोगी शिक्षण अभियान' हा उपक्रम. कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या यवतमाळ जिल्ह्यातील 'सतपल्ली' गावातील सहयोगी शिक्षण अभियान या उपक्रमाबद्दल.
कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन होता. या संसर्गाचा समाजातील विविध घटकांवर परिणाम झाला, यापैकी एक घटक म्हणजे विद्यार्थी. शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. शासनाने ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ उपक्रम राबवून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हते, तर काही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही अशा समस्यांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते.
अशातच देशभरातील विविध राज्यात मूल्यवर्धनवर उल्लेखनीय काम केलेल्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने ‘सहयोगी शिक्षण अभियान’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात गावातील सुशिक्षित तरुणांना ग्रामस्थांच्या मदतीने ‘शिक्षण सारथी’ म्हणून निवडले गेले. या शिक्षण सारथींनी पालक आणि गावातील सरपंचांची परवानगी घेऊन गावातील सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे समाज मंदिर, देऊळ अथवा घराबाहेरचे मोकळे अंगण अशा ठिकाणी ‘समाज विद्या केंद्र’ सुरु केले. यात जवळपासच्या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी ८ ते १२ असे चार तास शिकवले जाऊ लागले. खरंतर दररोज १.३० ते २.०० तास समाज विद्या केंद्र चालवावे ही अपेक्षा आहे.
अशाच प्रकारचे ‘समाज विद्या केंद्र’ यवतमाळ जिल्ह्यातील 'सतपल्ली' गावात प्रभावीपणे कार्यरत होते. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना या समाज विद्या केंद्रात रोज ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. शिक्षण सारथी अविनाश गेडाम यांनी गावचे सरपंच श्री. शंकर नारायण शिळाम यांची भेट घेवून गावात ‘समाज विद्या केंद्र’ सुरु करण्याची परवानगी घेतली आणि कोविड-१९ चे सगळे नियम पाळत गावात ४ समाज विद्या केंद्र सुरु केली. या ४ केंद्रांवर अविनाश गेडाम, गणेश कोतपल्लीवार, विकास मांडारकर, सिद्धार्थ कानिंदे असे चार ‘शिक्षण सारथी’ विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करू लागले.
शिक्षण सारथी म्हणून सेवा देणारे हे तरुण उच्चशिक्षित होते. यापैकी काही स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. या शिक्षण सारथींपैकी एक अविनाश गेडाम यांनी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन सोबत मूल्यवर्धन उपक्रमासाठी तालुका समन्वयक म्हणून काम केले होते. सहाजिकच त्यांना शिक्षण क्षेत्रात काम केल्याचा अनुभव होता. याच अनुभवाच्या जोरावर गावात समाज विद्या केंद्र चालवून विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवण्याचे कार्य केले.
शिक्षण सारथी म्हणून काम केल्याचा अनुभव मांडताना अविनाश गेडाम भारावून सांगतात की, “सहयोगी शिक्षण अभियान माझ्यासाठी अनुभवाचा खूप मोठा ठेवा आहे. देश लॉकडाऊन होता. संपूर्ण समाज भीतीच्या वातावरणात जगत होता. अशा वेळी शिक्षणापासून तुटत चाललेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचे काम आमच्याकडून झाले. मी माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी कमाई समजतो. आम्ही आमच्या गावात शिक्षण सारथी म्हणून काम केले. ‘शांतिलाल मुथ्था फाउंडेशन’कडून वेळोवेळी होणारे मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमानुसार आम्ही त्यांना शिकवत गेलो. आम्ही आमच्या गावात चार केंद्र उभी केली. यातून गावातील ५७ विद्यार्थ्यांनी समाज विद्या केंद्राचा लाभ घेतला. गावातील नागरिकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आदरयुक्त झाला. आणि आम्ही आमच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सारथी म्हणून काही काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करु शकलो. याचे आम्हाला मानसिक समाधान मिळाले. हा सत्कार्याचा ठेवा आम्ही आयुष्यभर जपून ठेऊ.”
शाळा बंद असल्याने गावातील मुले इकडे-तिकडे विनाकारण फिरताना दिसत होते. त्यांना शिक्षणाशी जोडून ठेवणे महत्त्वाचे होते. अशातच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सहयोगी शिक्षण अभियानाची संकल्पना आणली. गावातल्या मुलांसाठी काम करण्याची ईच्छा पूर्ण होणार होती. आपला वेळ ही सार्थकी लागणार होता, म्हणून सहयोगी शिक्षण अभियानात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे हे शिक्षण सारथी सांगतात. विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या कामातून काही प्रगती होत आहे या संदर्भात आठवड्यातून एक मीटिंग घेऊन आढावा घेत होते.
सहयोगी शिक्षण अभियानासाठी गावातील प्रत्येक नागरिकांचे चांगले सहकार्य होते गावात सुरु झालेला हा शैक्षणिक उपक्रम पाहून पालक तसेच गावचे सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक आनंदित होते. चार शिक्षण सारथींचे गावातील मुलांसाठी करत असलेले प्रभावी काम पाहून गावाच्या वतीने २६ जानेवारी २०२१ या प्रजासत्ताक दिनी जाहिर सत्काराचे आयोजन केले होते.
शिक्षण सारथी अविनाश गेडाम म्हणतात की, ''शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करुन सुरु केलेल्या या उपक्रमामुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि समाज उपयोगी कार्य करता आले. सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत महाराष्ट्रात समाज विद्या केंद्र सुरु केली. यासाठी शेकडो शिक्षण सारथींनी आपले योगदान दिले. कोरोनाच्या एवढ्या अस्वस्थ वातावरणात देखील कोविड-१९ चे सर्व नियम पाळत समाज विद्या केंद्रांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवता आले."
Comments
Post a Comment