कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ठप्पे झाले आहे. हे संकट आणखी कमी झालेले नाही. भारतात कोरोनाच्या दोन लाटा आल्या. दोन वेळा लॉकडाउन करावा लागला. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोरोनाचे दुष्परिणाम सर्वांना सहन करावे लागत आहेत. त्यापासून लहान-मोठे, स्त्री-पुरुष, विद्यार्थी-शिक्षक असे कोणीही सुटू शकले नाही. करोनाची समस्या ही फक्त आरोग्याची समस्या नसून ही शैक्षणिक समस्याही बनली आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
मागील दीड वर्षांपासून शाळा, कॉलेज बंद आहेत. अनेकांचे शिक्षण बंद झाले आहे. साहजिकच मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होऊन शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा शाळा पूर्ववत कधी सुरु होतील, हे निश्चित नाही.
या काळात फक्त ऑनलाइन माध्यमाद्वारे शिक्षणावर भर देण्यात येत आहे. पण भारतासारख्या खंडप्राय देशात ऑनलाइन शिक्षण हा काही सशक्त पर्याय असू शकत नाही. अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. लॅपटॉप, टॅब, स्मार्ट फोन अशी साधने ग्रामीण भागात अत्यल्प आहेत. त्याचशिवाय नेटवर्क समस्या, लोडशेडिंग अशा अडचणींना ग्रामीण भागात तोंड द्यावे लागते. शिवाय पालकांचाही ऑनलाइन शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे.

अशाही परिस्थितीत अनेक समस्यांवर मात करीत शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. शासनाने दूरदर्शनच्या माध्यमातून ऑनलाइन तासिका सुरू केल्या आहेत, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. पण याचा उपयोग जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना अत्यल्प होत आहे.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मुलांना शक्य असेल त्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी वेळ द्यावा. तसेच तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. तर शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील.

ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने ‘सहयोगी शिक्षण अभियान’ राबविले होते. याद्वारे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये समाज विद्या केंद्रांची स्थापना केली.तसेच त्याच गावातील शिक्षण सारथींची निवड करून त्यांना समाज विद्या केंद्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले. शिक्षण सारथींच्या माध्यमातून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षणामध्ये पडलेला खंड थोडासा का होईना भरून निघण्यास मदत झाली. या आनंदाने मुलांच्या मनातील मळभ दूर होऊन चेहऱ्यावर हास्य फुलले होते. आताही कोविड काळात विविध माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment